‘आपले सरकार’च्या सेवा आता व्हॉट्सअॅपवर

मुंबई : राज्य सरकारकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध ऑनलाइन सेवांचा आता व्हॉट्सअॅपवरही लाभ घेता येणार आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. ‘वर्षांव’ नागरिक संपर्क बैठकीत फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या नऊ सेवांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश दिले. तसेच प्रत्येक तालुक्यात सेवा पुरवठ्यासाठी स्वतंत्र रिंग प्रणाली तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, “सेवा पुरवठ्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी वायएसएस संस्थेमार्फत नियमित पडताळणी केली जावी. तसेच अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची निश्चित सीमा कायम ठेवावी. सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून नागरिकांना राज्यभर एकसमान अनुभव मिळेल.” या सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रिंग आणि क्लस्टर प्रणाली राबविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक रिंगमध्ये १२ गावांचा समावेश करून त्यानुसार सेवा पुरवल्या जातील. या व्यवस्थेसाठी स्वतंत्र गट आणि व्यवस्थापन टीम तयार केली जाणार आहे.

दरम्यान, मुख्य सचिव राजेश कुमार यांनी माहिती दिली की ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून सध्या १ हजार १ सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्यापैकी ९९७ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांतच त्यामध्ये २३६ नवीन सेवांची वाढ झाली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *