नारळाची विक्रमी आवक; तरीही महागाईचा चटका

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी नारळ व फळांची विक्रमी आवक झाली. एकाच दिवशी तब्बल ३ हजार टन फळांसह १ हजार २५२ टन नारळ बाजारात दाखल झाले. नारळानंतर सर्वाधिक ८७४ टन सफरचंदाची आवक झाली. या मोठ्या पुरवठ्यानंतरही दरामध्ये मात्र घट दिसली नाही, उलट किमतींनी ग्राहकांना चटका लावला. गत आठवड्यात सरासरी ३०० ते ४०० टन नारळ बाजारात येत होते. २२ ऑगस्ट रोजी नारळाची सर्वाधिक ६०० टन आवक झाली होती. मात्र मंगळवारी ती दुपटीहून अधिक झाली. तरीही वाढलेल्या मागणीमुळे दर आवाक्याबाहेर गेले.

होलसेल मार्केटमध्ये प्रतिनारळ ३० ते ३५ रुपयांना विकला जात होता; मात्र वाढलेल्या मागणीमुळे हे दर ३० रुपयांवरून ६३ रुपयांपर्यंत पोहोचले. किरकोळ बाजारात तर नारळ ५० रुपयांच्या पुढेच उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची मोठी कसरत सुरू आहे. गणेशोत्सव हा नारळाच्या मागणीचा हंगाम मानला जातो. पूजा, आरतीपासून प्रसादापर्यंत नारळाची आवश्यकता असल्याने बाजारात त्याला विशेष मागणी असते. त्यामुळे आवक विक्रमी असली तरी किमती वाढल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, आगामी दिवसांत मागणी आणखी वाढू शकते. नारळासोबतच इतर फळांचीही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

बाजार समितीत एका दिवसात ३ हजार टनांहून अधिक फळांची आवक झाली. यामध्ये सफरचंदाची ८७४ टन आवक सर्वाधिक होती. त्याचबरोबर २६५ टन डाळिंब, ३५५ टन मोसंबी, तसेच २७३ टन पेरसकट अननस, चिकू, पपई, प्लम, संत्री, सीताफळ यांचीही लक्षणीय आवक झाली.एकीकडे बाजारात पुरवठा भरपूर असूनही वाढत्या मागणीमुळे दर वाढले आहेत. ग्राहकांसाठी नारळ खरेदी महागडी ठरत असली, तरी शेतकरी व व्यापाऱ्यांना याचा थेट आर्थिक फायदा होत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *