मुंबई : तुमच्या ताटातील भाजीतील पनीर खरी आहे की बनावट, याची खात्री करणे आता गरजेचे ठरले आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात मुंबईत नफेखोरांकडून मोठ्या प्रमाणात पनीरऐवजी ‘चीज अॅनालॉग’ नावाचा बनावट पदार्थ विक्रीसाठी आणला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल ७५० किलो बनावट चीज अॅनालॉग जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जीटीबी नगर परिसरात छापा टाकण्यात आला. ‘ऑन क्लाउड नाइन’ आणि ‘श्री गणेश डेअरी’ या डेअरींवर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर बनावट माल हस्तगत करण्यात आला. डेअरी मालक अंबादास भंडारे यांच्या पथकाकडून बनावट पनीर तयार करून पॅकेटवर खोट्या ब्रँडचं स्टिकर चितकवले जात असल्याचे समोर आले. या मार्गाने शहरात भेसळयुक्त पनीर विक्रीसाठी पुरवले जात होते.
ग्राहकांसाठी इशारा
पोलिसांनी ग्राहकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. पनीर खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह ब्रँड व लेबलकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. लेबल नसलेले किंवा अनोळखी विक्रेत्याकडून मिळालेले पनीर टाळावे. खरे पनीर हे दणकट असते आणि त्याला नैसर्गिक गंध येतो. उलट बनावट पनीर हे रासायनिक स्वरूपाचे वाटते आणि जास्त दिवस टिकते.
रेस्टॉरंट व हॉटेलधारकांनाही इशारा
हॉटेल, कॅटरिंग व्यावसायिक आणि रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर पनीरयुक्त पदार्थ दिले जातात. त्यामुळे या ठिकाणीही बनावट मालाची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच रेस्टॉरंट्समधील पनीरयुक्त पदार्थ खाताना देखील ग्राहकांनी सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
काय आहे चीज अॅनालॉग?
‘चीज अॅनालॉग’ हा पदार्थ दिसायला अगदी पनीरसारखा असतो. मात्र तो खऱ्या दुधापासून तयार न होता दूधाची पावडर, पाम तेल आणि स्टार्च यांच्या मिश्रणातून बनवला जातो. हा पदार्थ प्रथिने, कॅल्शियम आणि पोषक घटकांपासून फारच गरीब असल्याने आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. जे लोक दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय म्हणून तो तयार केला जातो; मात्र याचा सर्रास वापर करून नफेखोरी केल्यास सामान्यांच्या आरोग्याशी मोठा खेळ होऊ शकतो.
कायदेशीर अट
एफएसएसएआयच्या नियमांनुसार, ‘चीज अॅनालॉग’ हा शब्द स्पष्टपणे नमूद करूनच हा पदार्थ विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात बनावट पनीरवर खोट्या ब्रँडची छाप मारून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहून पनीर खरेदी करावी आणि शंका आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Leave a Reply