विरार : गणेशोत्सवाच्या उत्साहात विरारमध्ये भीषण दुर्घटना घडली. विरार पूर्वेतील विजयनगर परिसरातील रमाईबाई अपार्टमेंटचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री पावसाच्या सुमारास कोसळला. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान गेले ४० तास अथक प्रयत्न करत आहेत.
रमाईबाई अपार्टमेंट ही अवघ्या १२ वर्षांपूर्वी, २०१३ मध्ये बांधण्यात आलेली चार मजली अनधिकृत इमारत होती. ९५ सदनिका असलेल्या या इमारतीतील ९२ सदनिका महापालिकेने अलीकडेच धोकादायक घोषित केल्या होत्या. नागरिकांना वेळोवेळी इशारा देऊनही अनेक कुटुंबे इमारतीत राहत होती. गणेशोत्सवाच्या दिवसांतच ही दुर्घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत लहान मुलांसह महिलांचा समावेश असलेल्या १७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये आरोही जोशी (२.५ वर्षे), उत्कर्ष जोशी (९), दिनेश राठोड (३२), सुचित्रा तिकदर (३०), रोहित चव्हाण (३६) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रमोद शिंदे (१९), प्रतिभा शिंदे (१९), सुमन किस्कू मिंडा (३०) यांच्यासह नऊ जण आहेत.
महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या या इमारतीची जबाबदारी निश्चित करत पोलिसांनी विकासक सुभाष माळी आणि गोपाल माळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
“कोसळलेल्या प्राथमिक २८ लोकांना वाचवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत,” असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले.
Leave a Reply