नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोकळगाव येथे घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. गावात विवाहित तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला पकडून, त्याच्यासह तरुणीची गावभर दोरीने हात बांधून धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. लखन भंडारे हा तरुण आपल्या विवाहित प्रेयसी संजीवनीला भेटण्यासाठी गोकळगावात आला होता. त्यावेळी संजीवनीच्या सासरच्यांनी दोघांना पकडले. गावकऱ्यांनी जमावासमोर त्यांची धिंड काढली. रात्री मात्र परिस्थिती आणखी भयानक बनली. संजीवनी हिचे वडील, काका आणि आजोबांनी मिळून दोघांना मारहाण केली आणि अखेरीस गावोगावीच्या विहिरीत फेकून निर्घृण हत्या केली.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनही सावध झाले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. ऑनर किलिंगप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, धिंड काढताना मोठा जमाव उपस्थित होता आणि या कृत्यात आणखी कोण सहभागी होते, याचा शोध घेणे सुरू आहे. गावाच्या सन्मानाच्या नावाखाली घडवून आणलेले हे दुहेरी हत्याकांड समाजातील मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. कायद्याने शिक्षा देण्याऐवजी स्वतःच्या हाताने जीव घेणाऱ्या कुटुंबियांच्या कृतीवर सर्वत्र टीका होत आहे. सध्या पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
Leave a Reply