मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधींना नवा वेग मिळत असून तब्बल ३४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी १७ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले आहेत. या करारामुळे राज्यात तब्बल ३३ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे करार पार पडले. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण उत्पादन आदी महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकण या भागांमध्ये नवीन उद्योग उभारणीला चालना मिळणार आहे.
सरकारने उद्योगांसाठी आवश्यक जमीन, परवानग्या आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया वेगाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राज्यात मल्टी-इयर टॅरिफ प्रणाली लागू झाली असून यामुळे आगामी काळात उद्योगांना मिळणाऱ्या विजेच्या दरांमध्ये वर्षागणिक कपात होणार आहे. पूर्वी उच्च वीजदर उद्योगांसाठी अडथळा ठरत होते, मात्र आता स्वस्त वीज उपलब्ध झाल्याने गुंतवणूक वाढीस नवा प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योगांना ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष पोर्टल सुरू केले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आवश्यक सुविधा, परवानग्या व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
या सामंजस्य करारात ग्राफाइट इंडिया, नेक्सस्ट जनरेशन मॅन्युफॅक्चरिंग, युरोबस इंडिया, व्हिस्ट्रॉन ऑटोमोबाईलट्रान्समिशन, युनो मिंडा ऑटो, जनरल पॉलीफिल्म्स, बीएसएल सोलर, सुप्रीम इंडस्ट्रीज, गोडरेज बायो मॅन्युफॅक्चरिंग, सेरम ग्रुप, अंबुजा सिमेंट आणि पारस ग्रुप यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला वेग येऊन तरुणांसाठी रोजगारनिर्मितीची नवी दारे खुली होणार आहेत.
Leave a Reply