नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा असतानाही नागपूरमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची तिच्याच शाळेसमोर चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अंजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे कॉलनीतील अंजनी शाळेजवळ घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव अँजेल जॉन (कौशल्यनगर, नॅप्र) असे आहे. आरोपी हा अल्पवयीन असून तो पीडितेच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
एकतर्फी प्रेमातून हत्या
अँजेल आणि आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. आरोपी हा त्याच शाळेत शिकला होता. मात्र, दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू होता. अँजेलने त्याच्या मैत्रीला नकार दिल्याने आरोपी नाराज होता. एकतर्फी प्रेमातूनच त्याने हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. शुक्रवारी शाळा सुटल्यावर अँजेल तिच्या मैत्रिणीसोबत घरी निघाली होती. काही मीटर अंतरावर आरोपी तिच्या मागोमाग गेला आणि तिला बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, अँजेलने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तिला पकडून वारंवार चाकूने भोसकले.
अँजेल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने परिसरात गोंधळ उडाला. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अंजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Leave a Reply