मुंबई : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातील व्हीआयपी आणि सामान्य भक्तांसाठी ठेवण्यात आलेल्या वेगवेगळ्या दर्शन व्यवस्थेबाबत अन्यायकारक भेदभाव होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने मंडळाला तसेच राज्य प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. अॅड. आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मंडळाविरोधात ही तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, दर्शनासाठी व्हीआयपी आणि सामान्य भक्त अशा स्वतंत्र रांगा ठेवणे हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन असून, धार्मिक असमानतेस कारणीभूत ठरते. दरवर्षी लाखो भाविक या मंडळाच्या दर्शनासाठी गर्दी करत असले तरी अशा भेदभावामुळे सर्वसामान्य भक्तांना त्रास सहन करावा लागतो, असा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलिस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त आणि लालबागचा राजा मंडळाच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून राय आणि मिश्रा यांनी तक्रारी दाखल केल्या असून, प्रशासन व पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली नसल्याने अखेर मानवी हक्क आयोगाची मदत घेण्यात आली आहे. शिवाय मंडळ परिसरातील रस्ते बंद झाल्याने वाहनधारक व दुचाकीस्वार त्रस्त होत असल्याचाही मुद्दा तक्रारीत मांडण्यात आला आहे. गणेशोत्सव हा लोकोत्सव असल्याने दर्शन सर्वांसाठी समान आणि खुला असावा, भेदभाव न करता न्याय्य व्यवस्था केली जावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.
Leave a Reply