तुळजापूर : श्री तुळजाभवानी पुजारी मंडळावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. मंडळाच्या कार्यप्रणाली व आर्थिक व्यवहारांवर गंभीर आरोप झाले असून, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. या प्रकरणामुळे तुळजापूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी सभासद किशोर आयाचितकर यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पुजारी मंडळाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून प्रॉपर्टीबाबत झालेले दुर्लक्ष मंडळाला तोट्याचे ठरले आहे. त्यामुळे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आयाचितकर यांनी मंडळाच्या कार्यकाळात वर्तमान सदस्यांनी सत्यासारखी वागणूक दिल्याचा आरोपही केला आहे.
या आरोपांना उत्तर देताना विद्यमान अध्यक्ष विपिन शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, पुजारी मंडळाच्या नावावरून काही जण जाणूनबुजून अपप्रचार करत आहेत. विकास आराखड्याबाबत मंडळावर चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र पुजारी मंडळाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. लवकरच धर्मादाय आयुक्तालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर उत्तर सादर केले जाणार असून, मंडळाचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. तुळजाभवानी देवस्थानाशी निगडित कामकाजात पुजारी मंडळाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मंडळावर आलेल्या आरोपांमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे सध्याचे पदाधिकारी आणि माजी सभासद यांच्यात थेट संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असून, यापुढे या प्रकरणाला कोणते वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply