एमआयडीसी जमीन वाटपासाठी ‘एमआयएलएएपी’ पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एमआयडीसी औद्योगिक जमीन अर्ज आणि वाटप पोर्टल (एमआयएलएएपी) लाँच केले. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना उपलब्ध औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचा तपशीलवार आढावा घेता येणार आहे. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेसमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून, ऑनलाइन पेमेंट आणि वेळेवर अर्ज पुनरावलोकन व मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पारदर्शक, वेगवान आणि सुलभ सेवा मिळणार आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “हे पोर्टल मध्यस्थांना दूर करून अर्जदारांना थेट एमआयडीसीकडे जोडेल. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊन गुंतवणुकीला गती मिळेल.” एमआयडीसीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे पोर्टल मेगा/अल्ट्रा प्रकल्प, दावोस सामंजस्य करार, मॅग्नेटिक महाराष्ट्र सामंजस्य करार, सरकारी पातळीवरील सामंजस्य करार आणि केंद्र/राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांसारख्या प्राधान्य श्रेणींसाठी उपलब्ध आहे.

अर्जदार आता रिकाम्या औद्योगिक भूखंडांसाठी थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, नियुक्त औद्योगिक वसाहतींमधील त्यांच्या प्रकल्प आवश्यकता पूर्ण करणारे भूखंड निवडून तत्काळ अर्ज करता येणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून, राज्यातील ‘व्यापाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *