ठाणे : ठाणे जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि विकासाची झेप यांचे दर्शन घडविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘छायाचित्रण स्पर्धा २०२५’ जाहीर केली आहे. या स्पर्धेमुळे हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना चार विषयांवर आधारित छायाचित्रे सादर करता येतील. त्यामध्ये १) वन्यजीव, २) निसर्ग, ३) संस्कृती आणि परंपरा तसेच ४) बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प यांचा समावेश आहे. प्रत्येक विषयासाठी प्रत्येक छायाचित्रकाराला जास्तीत जास्त चार छायाचित्रे पाठविण्याची मुभा असेल. छायाचित्रे उच्च प्रतीची (High-Resolution HD 10MB) असणे बंधनकारक असून ती thanedio2025@gmail.com या ईमेलवर पाठवावी लागतील.
छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त छायाचित्रांचे मूल्यमापन तज्ज्ञ समितीमार्फत केले जाणार असून निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. याशिवाय अंतिम १०० छायाचित्रांना ठाणे जिल्ह्याच्या नियोजित ‘कॉफीटेबल बुक’मध्ये संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह स्थान मिळणार आहे. जिल्ह्याचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपून तो व्यापक पातळीवर पोहोचवणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ठाणेकर छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा केवळ बक्षिसे जिंकण्याची नव्हे तर आपल्या कलाकृतींना कायमस्वरूपी नोंदविण्याचीही एक अनोखी संधी ठरणार आहे.
Leave a Reply