नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत करण्यात आलेल्या व्यापक सुधारणा १ ऑक्टोबरपासून लागू होणार असून, यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळेल आणि भारताच्या विकासाला अधिक वेग येईल. नव्या व्यवस्थेनुसार जीएसटीचे टप्पे चार वरून दोनवर आणण्यात आले आहेत. दैनंदिन वापरातील वस्तूंवर तसेच काही अत्यावश्यक वस्तूंवर करदर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती खर्च कमी होईल. मोदींनी सांगितले की, ही व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक सुलभ असून २१व्या शतकातील भारताच्या प्रगतिपथासाठी ती महत्त्वाची ठरेल.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांना संबोधित करताना मोदींनी सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी त्यांनी देशवासीयांना पुढील पिढीच्या सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. दिवाळी आणि छठपर्यंत नागरिकांना दुहेरी आनंद मिळावा म्हणूनच या सुधारणा आणल्या गेल्या आहेत. जीएसटी २.० मुळे व्यवहारात पारदर्शकता वाढेल, राज्यांना आणि केंद्राला स्थिर महसूल मिळेल तसेच व्यापार करणे सोपे होईल, असे त्यांनी नमूद केले. यामुळे बाजारातील वस्तूंचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतील आणि खरेदी-विक्रीची प्रक्रिया अधिक गतीमान होईल.
मोदींनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, काँग्रेसच्या काळात घरगुती उपभोगाच्या वस्तूंवर प्रचंड कर लावला जात असे. मात्र, त्यांच्या सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठे बदल केले आहेत. या नव्या प्रणालीमुळे देशातील उद्योग-व्यापार सुलभ होणार असून, अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. सामान्यांना थेट दिलासा मिळेल आणि विकास प्रक्रियेला नवे बळ मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
Leave a Reply