प्रभाग रचनेसाठी मुंबई महापालिकेकडे ४७० हरकती व सूचना; छाननी प्रक्रिया सुरू

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसंदर्भात मुंबई महापालिकेकडे एकूण ४७० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. मुंबईत २२९ प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून, या अनुषंगाने मिळालेल्या सूचनांची व हरकतींची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या माहितीप्रमाणे, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांवेळी ९१० हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. यंदा हा आकडा निम्म्याहून अधिक कमी झाला आहे. यावरून यावेळी नागरिकांचा प्रतिसाद तुलनेने थंड असल्याचे दिसून आले.

२०११ च्या जनगणनेनुसार केलेली मागील प्रभाग रचना यावेळी नव्याने करण्यात आली आहे. मात्र या नव्या रचनेत फारसे बदल झालेले नाहीत. फक्त काही ठिकाणी लोकसंख्या आणि झालेल्या विकासकामांच्या आधारे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रभाग रचनेत हरकती व सूचना तुलनेने कमी मिळाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नागरिक व विविध संघटनांनी दाखल केलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शहर व उपनगरातील विविध प्रभागांसाठी एकूण २३ अधिकारी नेमण्यात आले आहेत. पहिल्या दोन दिवसांत १७ हरकतींवर सुनावणी पार पडली असून, पुढील आठवड्यात ही प्रक्रिया वेगाने होणार आहे.

महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या सुनावणीनंतर सर्व हरकतींचा निपटारा करण्यात येईल. अंतिम अहवाल सादर झाल्यानंतरच प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी प्रभाग रचनेची प्राथमिक छाननी सध्या वेगाने सुरू असून, नागरिकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम नकाशा निश्चित होणार आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *