मुंबई : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल झाले असून राज्यातील शाळांची संख्या कमी झाली असली तरी शिक्षकांची संख्या तब्बल पाच हजारांनी वाढली आहे. यामुळे एकाच शिक्षकावर अनेक विद्यार्थ्यांचा भार कमी झाला आहे. प्रशिक्षित शिक्षकांच्या संख्येत झालेल्या वाढीचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
सध्या महाराष्ट्रात एकूण ७,४७,५०१ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पुरुष शिक्षकांची संख्या ३,५८,३३७ असून महिला शिक्षकांची संख्या ३,८९,३६४ इतकी आहे. प्राथमिक स्तरावर महिला शिक्षकांचे प्रमाण अधिक असून शिक्षण क्षेत्रातील स्त्रीशक्तीची भूमिका वाढलेली दिसते.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात महिला शिक्षकांचे प्रमाण ५०.५ टक्के इतके नोंदवले गेले आहे. तर २०२४-२५ मध्ये हे प्रमाण ५१ टक्क्यांवर पोहोचले आहे. हा बदल लक्षणीय असून ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये महिला शिक्षक अधिक प्रमाणात दिसू लागल्या आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा देखील वाढल्या आहेत. शाळांमध्ये ९९.३% ठिकाणी पिण्याचे पाणी, ९६.२% मुलांचे शौचालय, ९७.३% मुलींचे शौचालय, ९३.६% वीज सुविधा, ६४.७% संगणक तर ६३.५% इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे. खेळाचे मैदान असलेल्या शाळांचे प्रमाण ८३% आहे.
देशभरातील शिक्षकांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील ७५ ते ७७ टक्के शिक्षक प्रशिक्षित असून बहुतेकांकडे व्यावसायिक पात्रता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अहवालात नमूद झाले आहे.
शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वापरातही राज्याने मोठी झेप घेतली आहे. २०२३-२४ मध्ये संगणक आणि इंटरनेट सुविधा वाढल्याने शिक्षकांना अध्यापनात डिजिटल साधनांचा अधिक वापर करता येऊ लागला आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सामाजिक पार्श्वभूमी विविधतेने नटलेली असून ४५% ओबीसी, २७% सामान्य, १८% अनुसूचित जाती आणि १०% अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण क्षेत्रातील ही प्रगती महाराष्ट्राच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणातील आघाडीची साक्ष देत आहे.
Leave a Reply