सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने शनिदेवाच्या पूजेतील पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार भाविकांकडून आता थेट पूजाऱ्यांना दक्षिणा दिली जाणार नाही. अभिषेकासाठी भाविकांना थेट देवस्थानाकडे १०० रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतरच सहा अधिकृत पुरोहितांच्या मार्फत अभिषेक होईल. हा नवा नियम ६ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. भाविकांनी दान द्यायचे असल्यास उदासीन महाराज मठ व यज्ञमंडपामध्ये ठेवलेल्या दानपेटीतच पैसे टाकावे लागतील. विशेष म्हणजे १००० रुपयांहून अधिक रकमेमुळे मोठ्या देणगीदार व पंचकोशीतील भाविकांकडून अभिषेक देणगी स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे पूजेमध्ये होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणीला पूर्णविराम मिळणार आहे.
देवस्थान मंडळाने सहा पुरोहितांची नेमणूक करून त्यांना मानधनावर काम देण्याचा निर्णय घेतला आहे. पहाटे ४ वाजल्यापासून रात्री साडेअकरापर्यंत दोन शिफ्टमध्ये हे पुरोहित काम पाहतील. यावेळी पूजाऱ्यांना मोबाईल वापरण्याची मुभा नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पूजेतील गांभीर्य आणि शिस्त टिकून राहील, असा विश्वास विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे. शनिशिंगणापूर हे देशातील प्रमुख श्रद्धास्थान असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे पूजेत पारदर्शकता व नियोजन असणे अत्यावश्यक होते. भाविकांना अभिषेक करण्याची सोय आता थेट देवस्थानच्या नियंत्रणाखाली होत असल्याने शिस्तबद्ध पद्धतीने धार्मिक विधी होणार आहेत. देवस्थानच्या या निर्णयाचे स्वागत भाविक व ग्रामस्थांकडून होण्याची अपेक्षा आहे.
Leave a Reply