मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने “व्हिजन डॉक्युमेंट 2047” या महत्त्वाकांक्षी आराखड्याला दिशा ठरवली आहे. या आराखड्यानुसार भविष्यातील धोरणे तयार करून विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथिगृह येथे या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग-सेवा, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या क्षेत्रातील आराखड्यांवर सविस्तर सादरीकरण झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गीता, बायबल, कुराणप्रमाणेच हे व्हिजन डॉक्युमेंट देखील आपल्यासाठी मार्गदर्शक तत्व आहे. पुढील दोन-पंचवीस वर्षांसाठी आपण काय साध्य करणार आहोत, याची स्पष्ट दिशा ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छोट्या मुदतीतील आराखडे तयार करून न थांबता प्रदीर्घ आणि ठोस नियोजन केले पाहिजे. प्रत्येक सादरीकरण सखोल आणि उत्कृष्ट झाले असून त्यानुसार कार्य करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या बैठकीत आपले विचार मांडले. ते म्हणाले, “बावीस वर्षांनंतर महाराष्ट्र कसा असावा याचे स्पष्ट चित्र या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये दिसते. भविष्याचा रोडमॅप घेऊन राज्याला दिशा देणारा हा आराखडा ठरणार आहे.”
या व्हिजन डॉक्युमेंटमुळे शिक्षण, आरोग्य, उद्योग, सामाजिक कल्याण अशा विविध क्षेत्रांत ठोस कामगिरी घडवून आणण्याचा सरकारचा निर्धार स्पष्ट झाला आहे. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी या दस्तऐवजाचा वापर आगामी सर्व धोरणांसाठी आधारभूत ठरणार आहे.
–
Leave a Reply