सोलापूर/मुंबई : माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदा मुरूम उपसा प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. या कारवाईदरम्यान डिवायएसपी अंजना कृष्णा यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाद वाढला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, कायद्याप्रमाणे कारवाई झाली आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेकदा स्थानिक स्तरावरून विविध निवेदने येतात आणि त्यावरून अधिकारी तातडीने कारवाई करतात. मात्र, प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे तपासणे महत्त्वाचे असते. अधिकारी परिस्थितीची खरी माहिती ठेवतात, त्यामुळेच या प्रकरणाचा सखोल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्राथमिक अहवाल दिला असून त्यात संबंधित मुरूम उपसा पूर्णपणे बेकायदा असल्याचे नमूद केले आहे. या कामासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले. पुढील दोन दिवसांत हा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. मात्र, पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण देत, त्यांनी केवळ परिस्थिती जाणून घेण्यासाठी अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती असे सांगितले. तरीदेखील या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे आता पुढील काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे कुर्डू मुरूम उपसा प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply