मुंबईत मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईवर हल्ल्याची तयारी करणाऱ्या आयसीसशी (ISIS) संबंधित दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. आफताब अन्सारी आणि सूफियान अबुबकर खान या दोन दहशतवाद्यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघे मुंबईला रवाना होण्याच्या तयारीत होते. त्यांच्या ताब्यातून तीन पिस्तुलं, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

आफताब आणि सूफियान हे मुंबईतच राहणारे असून त्यांनी हरियाणातील मेवात भागातून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांची खरेदी केली होती. स्पेशल सेलने मुंबईतील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले असता तेथूनही शस्त्रसामग्री आणि स्फोटके बनवण्याचे साहित्य सापडले. प्राथमिक चौकशीतून समोर आले की हे दोघे पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात होते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार करत होते.

या कारवाईत फक्त मुंबईपुरतेच नव्हे तर देशभरातील दहशतवादी मॉड्यूलचा खुलासा झाला आहे. स्पेशल सेल आणि केंद्रीय यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत एकूण पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये दोन दिल्लीतील, तर प्रत्येकी एक मध्य प्रदेश, तेलंगणातील हैदराबाद आणि झारखंडमधील रांची येथील आहे. अटक केलेल्यांमध्ये अशर दानिश, हुजैफा यमन आणि कामरान कुरेशी यांचा समावेश आहे.

रांची येथील अशर दानिश भारतातूनच दहशतवादी मॉड्यूल चालवत होता. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीची पिस्तुलं, मोठ्या प्रमाणात दारुगोळा, आम्लं, सल्फर पावडर, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, तसेच रोख रक्कम जप्त झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी भारतात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. तरुणांना धर्माच्या नावाखाली कट्टरतावादी बनवून त्यांच्या संघटनेत सामील करण्याचा प्रयत्नही सुरू होता. या धडक कारवाईमुळे संभाव्य मोठा दहशतवादी हल्ला टळला असून मुंबईसह देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *