दौलताबादजवळील समृद्धी महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात झालेल्या निष्काळजीपणामुळे अनेक वाहनांचे टायर पंचर झाले. या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना अशी की, माळीवाडा गावाजवळील पुलावर पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी इंजेक्शनने नोजल बसविण्याचे काम मंगळवारी मध्यरात्री सुरू होते. कामादरम्यान वाहतुकीसाठी योग्य अशी सुरक्षा व्यवस्था न करता काम सुरू ठेवण्यात आले. आवश्यकतेनुसार फलक, बॅरिकेटिंग व दर्जेदार रिफ्लेक्टर न लावल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडचणींना सामोरे जावे लागले. या निष्काळजीपणामुळे रात्री अनेक वाहनांचे टायर पंचर झाले.
महामार्गाची देखभाल व दुरुस्तीचे काम मेधा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचे कंत्राटदार सत्यनारायण यांनी कामादरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्था न केल्याने हा प्रकार घडला. पोलिस अमलदार योगेश पांडुरंग सूर्यवंशी यांनी याबाबत दौलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गुरुवारी रात्री १०.४५ वाजता सत्यनारायण यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेगवान समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी नेहमीच काळजी घेणे आवश्यक असताना अशा निष्काळजी कामामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची टीका होत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापू ढोमळे करीत आहेत.
Leave a Reply