नागपूर : “भारत मोठा होत चालल्याने काही देश अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळेच भारतावर टॅरिफ लावले गेले,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. हिंगणघाटच्या जाम येथील विश्वशांती सरस्वतीच्या वार्षिक उत्सवदर्शनात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, “भारताची प्रगती जगाला दिसते आहे. सातासमुद्रापलीकडील काही देशांशी आपले थेट संबंधही नसतात, तरीही भारत जागतिक स्तरावर मोठा झाला तर त्यांचे स्थान कुठे सरकतील, ही भीती त्यांना वाटते. या मानसिकतेतूनच टॅरिफ लावण्यात आले.”
समाजातील वाढत्या संघर्षांवर भाष्य करताना भागवत यांनी विचारांचा योग्य दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले. “आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मर्म काय आहे, हे समजले नाही तर आपण खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालो आहोत की नाही, हेही समजणार नाही. आत्मीयतेची भावना मनात असेल तर शत्रुत्व उरत नाही,” असे ते म्हणाले. भागवत यांनी व्यक्ती आणि समाजाच्या नात्याचा उहापोह करताना सांगितले की, जर प्रत्येकाने ‘मी आणि माझे कुटुंब’ या विचारापलिकडे जाऊन समाजाचा विचार केला तरच खरी प्रगती शक्य आहे. समस्यांचा उगम हा समाज व व्यक्तीच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन न झाल्यामुळेच होतो, असे ते म्हणाले. भारताची परंपरा ही समस्यांवर उपाय शोधण्याची आहे. भारत जगाला मार्गदर्शन करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर भारतीयांनीही ज्ञानसंपन्न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, विचारांचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास अनेक अडचणी आपोआप दूर होतात.
Leave a Reply