नागपूर : विदर्भातील पत्रकारिता क्षेत्राला प्रेरणा देणारे ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि पत्रकार स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा “स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. नवराष्ट्र डिजिटलचे राजकीय संपादक मनोज भोयर यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. त्यांच्यासह दैनिक हितवादाचे सहसंपादक राहुल दीक्षित, ज्येष्ठ छायाचित्रकार रणजित देशमुख आणि दैनिक नवराष्ट्रचे संपादक धनराज गावंडे यांना मिळणार आहे.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार गेल्या चार दशकांपासून दिला जात असून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्याचा यामागचा हेतू आहे. पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज शनिवारी (13 सप्टेंबर) रोजी सायं. 5.30 वाजता नागपूर प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स येथे होणार आहे. या कार्यक्रमाला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त मा. राहुल पांडे प्रमुख अतिथी असतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रेस क्लबचे अध्यक्ष मा. प्रदीप मैत्र भूषवतील.
स्व. अनिलकुमार हे केवळ कवीच नव्हे तर विचारवंत आणि निर्भीड पत्रकार म्हणूनही परिचित होते. त्यांच्या कार्याची परंपरा कायम ठेवण्याचा आणि नव्या पिढीतील पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या पुरस्काराद्वारे केला जात आहे. नागपूरच्या पत्रकारितेच्या परंपरेला उभारी देणारा हा पुरस्कार सोहळा पत्रकारिता विश्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Leave a Reply