पुणे : येत्या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवाईत तब्बल ४३ कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांचे उपआयुक्त (झोन 1) ऋषिकेश रावळे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले होते. यात टोळी युद्धे, खून, महिलांवर होणारे गुन्हे, सोनसाखळी चोरी तसेच खिसेकापरे अशा गंभीर घटनांचा समावेश आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही मोठी कारवाई हाती घेतली आहे.
रावळे यांनी सांगितले की, “गेल्या काही काळात किरकोळ वादांवरून गुन्हेगारांकडून गोळीबार किंवा शस्त्रांनी हल्ले करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना आक्रमक पावले उचलावी लागली. आमचा उद्देश नागरिकांच्या मनातील भीती दूर करून सुरक्षा व विश्वास निर्माण करणे हा आहे.”
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांवर खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, टोळीयुद्ध तसेच नागरिकांवर हल्ला करण्याचे आरोप आहेत. या सर्वांना शहरात परेड करून दाखविण्यात आले, जेणेकरून जनतेला पोलिसांची कारवाई दिसून येईल. या मोहिमेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक कडक होईल आणि नागरिकांना निर्धास्तपणे उत्सव साजरा करता येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply