लखनऊ/ठाणे : उत्तर प्रदेश एटीएसने (Anti-Terrorism Squad) एक मोठा फसवणुकीचा कारनामा उघडकीस आणला आहे. ‘गाझा पीडितांना मदत’ या नावाखाली तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी गोळा करून तो वैयक्तिक वापरासाठी आणि संशयास्पद कामांसाठी वळविण्यात आल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे करण्यात आली. शनिवारी उशिरा रात्री एटीएसने भिवंडीमध्ये छापा टाकून तीन तरुणांना अटक केली. प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले की, ही फसवणूक फक्त भिवंडी आणि उत्तर प्रदेशापुरती मर्यादित नसून भारतातील किमान २० राज्यांत पसरलेला होता.
एटीएसने जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आर्थिक पुराव्यांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण कारवाईचे सूत्रधार ग्रीसमध्ये बसलेले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. हा मास्टरमाइंडच या संपूर्ण फंडरेजिंग सिंडिकेटचा मुख्य हँडलर होता. त्याच्याकडूनच भिवंडीतील तरुणांना आदेश दिले जात होते.
‘गाझा पीडितांसाठी निधी’ या नावाखाली लोकांच्या भावनांचा गैरवापर करून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचे तपास यंत्रणेला आढळले आहे. देशभरातून या मोहिमेतून कोट्यवधी रुपये गोळा झाले आणि त्याचा वापर नेमका कुठे झाला हे आता एटीएस तपासणार आहे.
या प्रकरणामुळे निधी गोळा करणाऱ्या विविध संस्थांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून होत असलेल्या या गैरव्यवहारामागे आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा तपास आता अधिक वेगाने होणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. लोकांच्या दानशूर वृत्तीचा गैरफायदा घेतलेला हा प्रकार उघड झाल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील काही दिवसांत अजून अटक होण्याची शक्यता असून, या रॅकेटचे सर्व धागेदोरे उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Leave a Reply