नवी दिल्ली : भारतातील लोकसंख्येच्या रचनेत मोठे बदल दिसत असून कामकाजाच्या वयोगटातील (१५-५९ वर्षे) लोकसंख्या तब्बल ६६.१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. १९७१ मध्ये ही टक्केवारी सुमारे ५३ इतकी होती. नमुना नोंदणी प्रणाली (Sample Registration System) च्या २०२३ मधील सांख्यिकीय अहवालात ही माहिती समोर आली आहे.
महिलांच्या बाबतीत हा आकडा पुरुषांच्या तुलनेत किंचित जास्त आहे. सुमारे ६६ टक्के महिला या गटात येतात, तर पुरुषांची टक्केवारी ६५.९ आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोकसंख्येत महिलांचा थोडासा जास्त सहभाग दिसून येतो.
राज्यानुसार पाहता दिल्ली या गटातील लोकसंख्येत अव्वल आहे. येथे ७०.८ टक्के लोक १५-५९ वयोगटात मोडतात. त्यानंतर तेलंगणा (७०.२ टक्के) आणि आंध्र प्रदेश (७०.१ टक्के) यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ही टक्केवारी ६७.७ आहे.
याउलट, ०-१४ वयोगटातील मुलांची संख्या घटल्याचे दिसते. १९७१ मध्ये देशातील ४१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या वयोगटात होती, परंतु २०२३ मध्ये हा आकडा २४ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची टक्केवारी ९.७ इतकी आहे.
या अहवालात ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील फरकही स्पष्ट झाला आहे. १५-५९ वर्षांच्या वयोगटातील लोकसंख्येपैकी शहरी भागात राहणाऱ्यांचे प्रमाण ६८.६ टक्के इतके असून ग्रामीण भागातील टक्केवारी ६४.६ आहे. यावरून कामकाजाच्या वयोगटातील लोक शहरी भागात अधिक प्रमाणात स्थायिक होत असल्याचे दिसते.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की भारतातील लोकसंख्या आता मोठ्या प्रमाणात कामकाजाच्या वयोगटात आहे. हे देशाच्या आर्थिक विकासासाठी मोठे साधन मानले जात असले तरी रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि सामाजिक सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांना अधिक महत्त्व द्यावे लागणार आहे.
Leave a Reply