मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (23 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यभरातील 70 लाख एकरांपेक्षा जास्त क्षेत्र पावसामुळे बाधित झाले असून, यासाठी सरकारने 2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 1339 कोटी रुपयांची मदत दिली जाणार असून, तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आदेशही देण्यात आले.
मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, जालना जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाचे भीषण परिणाम दिसून आले आहेत. यामुळे सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश देण्यात आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या (24 सप्टेंबर) धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत.
आजच्या बैठकीत आरोग्य, परिवहन, महसूल, गृहनिर्माण व गृह विभागातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी 491 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली. तसेच गृहनिर्माण विभागांतर्गत मुंबईतील अंधेरी येथील एसव्हीपी नगरमध्ये म्हाडामार्फत सामूहिक पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास वेळ लागू शकतो, मात्र राज्य सरकार थांबणार नाही. आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून, पुढील आठ-दहा दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही नुकसानभरपाई जमा होईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply