मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला जाग आणण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नुकत्याच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचा या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ अंतर्गत पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तातडीने नोटीफिकेशन काढावे, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
सरकारने तातडीने कार्यवाही केली नाही, तर ११ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच, २५ नोव्हेंबर संविधान दिनी आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा देण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरातील पत्रकार मोठ्या प्रमाणात एसएमएस मोहीम राबवून विनंती करणार असल्याचेही बैठकीत निश्चित झाले.
या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, शैलेंद्र शिर्के, राही भिडे, किरण नाईक, राजा अदाते, शरद पाबळे, मिलिंद आष्टिवकर, ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सुजित महामुलकर, क्राइम रिपोर्टर असोसिएशनचे विशाल सिंह, डिजिटल मिडिया परिषद महाराष्ट्रचे गणेश जगताप, युवराज जगताप, सुनील ह. विश्वकर्मा, अजय मगरे आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे राजेंद्र साळसकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोठे आंदोलन उभारले जाणार आहे.
Leave a Reply