पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी बिहारमधील ७५ लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेतून प्रत्येकी १० हजार रुपये जमा करणार आहेत. या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार असून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा मार्ग खुला होणार आहे.
‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत या मदतीचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. एकूण ७,५०० कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार असून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
ग्रामीण विकास विभागाच्या माहितीनुसार, या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल १.११ कोटी अर्ज महिलांकडून प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागात या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण विकास विभागाकडून, तर शहरी भागात शहरी विकास विभागाकडून केली जाणार आहे.
ही योजना ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत बिहारच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देईल, असा सरकारचा विश्वास आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर जीविका स्वयं-सहायता गटांच्या सहभागातून योजनेचा विस्तार केला जाईल.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या, १८ ते ६० वयोगटातील, न्यूक्लियर कुटुंबातील आणि कर न भरणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच अविवाहित अशा प्रौढ महिलाही पात्र ठरणार आहेत ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे.
ही योजना बिहार मंत्रिमंडळाने २९ ऑगस्ट रोजी मंजूर केली होती. सहा महिन्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर पात्र महिलांना आणखी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. सुरुवातीस दिले जाणारे १० हजार रुपये परत करावे लागणार नाहीत, अशी माहिती सरकारने दिली आहे.
Leave a Reply