मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी जमीन व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना निष्पक्ष पंचनाम्यांशिवाय थेट मदत द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
राज ठाकरेंनी या पत्रात शेतकऱ्यांसाठी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती काहीशी बिकट असली तरी मदतीचा हात आखडता घेऊ नये, तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पॅकेजमधून महाराष्ट्रालाही पुरेशी मदत द्यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
फक्त शेतकरीच नव्हे, तर आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील मुलांना वेळेवर पुस्तके-वह्या उपलब्ध करून द्याव्यात, तसेच त्यांच्या सहामाही परीक्षेत मानसिकतेचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय रोगराई पसरू नये म्हणून जिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश सरकारने आरोग्य विभागाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांसाठी बँका दबाव टाकणार नाहीत, यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत, असेही राज ठाकरे यांनी पत्रात स्पष्ट केले.
राज ठाकरेंच्या या मागणीमुळे सरकारसमोर शेतकरी व आपत्तीग्रस्तांसाठी तातडीची निर्णयप्रक्रिया राबवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
Leave a Reply