मुंबई : अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्राद्वारे हिंडेनबर्ग रिसर्चवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ अदानी समूहच नव्हे तर संपूर्ण भारतीय उद्योगक्षेत्राचे जागतिक स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गने केला, असे ते म्हणाले.
अदानी यांनी आपल्या पत्रात २४ जानेवारी २०२३ या तारखेचा विशेष उल्लेख केला. या दिवशी हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध अहवाल प्रसिद्ध करून भारतीय भांडवली बाजाराला धक्का दिला. मात्र या कटातून उद्योगक्षेत्र अधिक सक्षम आणि मजबूत झाले, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले की, अदानी समूह पारदर्शकता, सुशासन आणि शाश्वत विकासाच्या तत्वांवर ठाम असून, सेबीच्या तपासात फसवणुकीचे आरोप खोटे ठरले आहेत.
सध्या गौतम अदानी यांची संपत्ती १३.८ अब्ज डॉलर्स असून, ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत २०व्या क्रमांकावर आहेत. मागील वर्षभरात त्यांच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलर्सची भर पडली असली तरी अलीकडेच २.०१ अब्ज डॉलर्सची घट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सेबीने अदानी समूहाला क्लिन चिट देताना कंपनीवरील आरोपांना कोणतेही पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भागधारकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अदानी म्हणाले की, ही कठीण परीक्षा समूहाच्या पायाभरणीला अधिक भक्कम बनवणारी ठरली आहे.
पत्राच्या अखेरीस त्यांनी काव्यात्मक शैलीत लिहिले की, “लाटांना घाबरणारी होडी किनारा गाठू शकत नाही.” या ओळींमधून अदानी यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. अदानींच्या या भूमिकेमुळे हिंडेनबर्गच्या आरोपांवर पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता असून, भारतीय उद्योगक्षेत्रावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.
Leave a Reply