रायगड : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल १९ कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रायगडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी रायगड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत देशभरातील विविध बँकांमधील ४४ खात्यांतील रक्कम गोठवली आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या फसवणुकीच्या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यात सहभागी आरोपींमध्ये भारतात हनुमान मीना, राजवीर, जितेंद्र, माही, सागर पुजारी, विक्रम यांचा समावेश असून त्यांनी ऑनलाइन गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून हजारो लोकांना जाळ्यात ओढले. आरोपींनी लोकांना आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखवत बनावट लिंक पाठवल्या आणि त्याद्वारे त्यांचे बँक तपशील मिळवून मोठ्या प्रमाणावर पैसे वळवले.
सायबर पोलिसांनी तपास सुरू करताच या टोळीमागील अॅप्सचा मागोवा घेतला आणि अनेक बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या संशयास्पद व्यवहारांचा तपशील मिळवला. तपासात समोर आले की, आरोपींनी दोन महिन्यांत सुमारे १९ कोटी रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले होते. ही खाती देशभरातील विविध बँकांमधील असून ती बहुधा बनावट कागदपत्रांवर विविध व्यक्तींच्या नावाने उघडण्यात आली होती.
फसवणुकीचा तपास रायगड सायबर पोलिस स्टेशनचे अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास अधिकारी शैलेश पाटील, निरीक्षक संतोष काळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिरसाट यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपींना अटक केली आणि निधी गोठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या प्रकरणामुळे ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीबाबत सर्वसामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही संशयास्पद लिंक किंवा अज्ञात अॅप्स डाउनलोड न करण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईनंतर आणखी काही आरोपींविरोधात तपास सुरू असून फसवणुकीचा पूर्ण तपशील पुढील काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे.
Leave a Reply