दक्षिण मुंबई ते बीकेसीपर्यंत भुयारी मार्गाचा विचार; वाहतूककोंडीला दिलासा मिळणार

मुंबई : महानगरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे दिवसेंदिवस तीव्र होत असलेल्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्याची तयारी केली आहे. दक्षिण मुंबईपासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुढे पूर्व उपनगरांपर्यंत थेट जोडणारा भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

या प्रकल्पासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळून सुरू होणारा हा मार्ग बीकेसीपर्यंत आणि त्यानंतर विमानतळाशी जोडला जाणार असून, पुढे ठाणे आणि बोरीवलीपर्यंतही विस्ताराचा विचार आहे. या मार्गामुळे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि रस्त्यावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.

सध्या मुंबईत रस्त्यांसाठी जमीन उपलब्ध करण्यात मोठ्या अडचणी येत असल्याने भुयारी मार्ग हा एकमेव पर्याय ठरू शकतो. बुलेट ट्रेन स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होणार असून, विद्यमान मार्गांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

कोस्टल रोडचा शेवट वरळी येथे होत असल्याने तेथून बीकेसी आणि विमानतळाकडे भुयारी मार्ग तयार करण्याची योजना आहे. पुढे हा मार्ग ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाशी जोडल्यास संपूर्ण मुंबईसाठी हे एक व्यापक वाहतूक जाळे ठरू शकते.

सध्या ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गाचे काम सुरू असून, त्याची लांबी ११.८५ किमी आणि खर्च सुमारे ₹१८,८३८ कोटी इतका आहे. तर गेटवे ऑफ इंडिया ते बीकेसी, विमानतळ, ठाणे आणि बोरीवलीपर्यंतच्या भुयारी मार्गासाठी ₹९,१५८ कोटींचा अंदाजित खर्च असून, लांबी सुमारे ९.२३ किमी असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईच्या वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवू शकतो.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *