छत्रपती संभाजीनगर – दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित झालेल्या ऑरिक सिटीत आणखी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सोमवार (२९ सप्टेंबर) रोजी शेंद्रा येथील ऑरिक टाउनहॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
सामंत यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक औद्योगिक गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण बनला आहे. प्लग अँड प्ले सुविधेमुळे ऑरिक सिटीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले असून, आता या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे ५ हजार एकर जमिनीचे संपादन पुढील एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या जमिनीवर सुमारे ५० हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
औद्योगिक सुरक्षेसाठी ऑरिक सिटीत पोलिस ठाणे उभारण्यात येणार आहे. उद्योग प्रतिनिधींनी एक एकर जागेची मागणी केली असली तरी सामंत यांनी पाच एकर जागा देण्याची तयारी दर्शवली. प्रशासनाने तात्काळ जागा निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सामंत यांनी शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवरही भाष्य केले. औद्योगिक विकासासाठी शेतकऱ्यांनी मोठे सहकार्य केले आहे आणि त्यांच्या हक्कांचा विचार करूनच जमीन संपादन केले जाईल, तसेच योग्य मोबदला देण्यात येईल, असे ते म्हणाले.
विठलवाडी परिसरात वाढत्या मागणीमुळे आणखी जमीन संपादन करण्याची गरज भासणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि एमआयडीसी अधिकारी उपस्थित होते.या नव्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास उद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply