मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून विमानतळाच्या नामकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की विमानतळ राज्य शासनाच्या हद्दीत असल्याने केंद्र सरकारकडून वेगळा आक्षेप नाही. केंद्राने पूर्वी “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” या नावाने बांधकामासाठी परवानगी दिली होती. मात्र आता राज्य सरकारने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नामकरणाचा ठराव विधिमंडळातून मंजूर करून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.
या निर्णयामुळे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कोव्हिड काळात काही आंदोलनांदरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत नियमांनुसार न्यायालयाच्या परवानगीनंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकाळच्या मागणीला न्याय मिळणार आहे.
दरम्यान, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामविस्ताराचेही प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. हे प्रस्ताव केंद्राकडून लवकरच मान्य होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या घोषणांमुळे राज्यातील तीन महत्त्वाच्या विमानतळांच्या नामकरणावर पडदा पडणार असून, स्थानिक जनतेच्या भावना आणि ऐतिहासिक वारशाला मान मिळणार आहे.
Leave a Reply