टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस
राज्यात विकासाचे नवे पर्व : मुख्यमंत्री फडणवीस
स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आणि टाटा मोटर्स फाउंडेशनमध्ये करार
मुंबई – राज्यात ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षेला नवे बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभाग, ग्रामीण विकास विभाग, एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात सोमवारी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या करार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारामुळे राज्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या प्रभागात ‘समृद्ध ग्राम मिशन’अंतर्गत कामे राबवली जाणार आहेत. ग्रामीण भागातील शाश्वत विकास आणि गरीबी निर्मूलनासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरेल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. महिला शेतकरी हा शेती व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सहभागातून उत्पादनाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मजबुती मिळेल.” त्यांनी पुढे सांगितले की, “पोषण सुरक्षेसाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरेल.”
या करारामुळे टाटा मोटर्स फाउंडेशनकडून ग्रामीण भागातील विकासासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मिळणार आहे. राज्य सरकार आणि फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून गावांचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. फडणवीस म्हणाले की, “राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे एक नवे पर्व ठरेल.”
या सोहळ्यात डॉ. सोम्या स्वामिनाथन, टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस
•
Please follow and like us:
Leave a Reply