कर्जमाफीपेक्षा थेट मदत अधिक महत्त्वाची – फडणवीसांची भूमिका, राज्य सरकारकडून 31,628 कोटींचे मदत पॅकेज जाहीर”

मुंबई – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा देत तब्बल 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही मोठं विधान केलं. “आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, “आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे गेलेलो नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची थेट आर्थिक मदत गरजेची आहे. कर्जमाफी केली तरी ज्याची जमीन खरडून गेली, त्याला माती कुठून आणणार? त्यामुळे आधी मदत आणि नंतर कर्जमाफी हा आमचा दृष्टिकोन आहे.”

राज्यातील 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडळांतील शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ मिळणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्‍टरी 18,500 रुपये, बागायती शेतकऱ्यांना 32,500 रुपये, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्‍टरी 47,000 रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच मनरेगा योजनेतून हेक्‍टरी 3 लाख रुपये जमिनी पुन्हा तयार करण्यासाठी दिले जाणार आहेत.

याशिवाय बाधित विहिरींसाठी आणि गाळ काढण्यासाठी 30 हजार रुपयांपर्यंतची मदत, तसेच दुग्धाळ जनावरांसाठी 37,500 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मदत मिळवण्यासाठी यावेळी 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या मते, या पॅकेजमधील 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम केवळ पिकांसाठी राखीव आहे. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आर्थिक मदत ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *