महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या शिवसेनेच्या धनुष्य-बाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज जवळपास दोन महिन्यांनी सुनावणी झाली. या प्रकरणात पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने धनुष्य-बाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले होते. याच निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. अॅड. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.” या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जलद सुनावणीची मागणी केली होती.
यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिवाळीनंतर सुनावणी होईल, असे सांगितले. यामुळे सध्या धनुष्य-बाण चिन्हाच्या मालकीचा प्रश्न काही दिवसांसाठी अनिर्णीत राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या खटल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार यावर निवडणुकांमधील प्रचार, ओळख आणि मतदारांची भूमिका ठरणार आहे.
हा वाद फक्त ठाकरे विरुद्ध शिंदे गट इतकाच मर्यादित नाही, तर भविष्यातील राजकीय फुटी आणि निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेसाठीही तो एक आदर्श ठरू शकतो. दिवाळीनंतर होणारी ही सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहू शकते.
Leave a Reply