लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर आणि निलंगा तालुक्यांमधील तीन आत्महत्याग्रस्त प्रकरणांमध्ये बनावट सुसाईड नोट तयार करून पोलिसांना फसविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य शासकीय दस्तऐवज परिक्षक गुन्हे परिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या अहवालानंतर या चिठ्ठ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी येथील बळीराम श्रीपती मुळे (वय ३६) यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांच्या नातेवाईकाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना दिली होती. तपासानुसार ही चिठ्ठी मृताचा चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी भिवाजी मुळे यांनी स्वतः लिहिल्याचे उघड झाले.
निलंगा तालुक्यातील दादगी येथील शिवाजी वाल्मीक मळळे (वय ३२) यांचा दि. १३ सप्टेंबर रोजी करंट लागून मृत्यू झाला होता. त्याच्या कपड्यांमध्ये मिळालेल्या चिठ्ठीत “महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आत्महत्या” असा उल्लेख होता. परंतु तपासात ही नोट माधव रामराव पिठले यांनी लिहिल्याचे स्पष्ट झाले.
चाकूर तालुक्यातील हनमंतवाडी येथील अनिल बळीराम राठोड (वय २७) याचा दि. १४ सप्टेंबर रोजी विद्युत पंपाच्या करंटमुळे मृत्यू झाला. घटनेनंतर शिवाजी फत्तू जाधव यांनी सुसाईड नोट सादर करून मृताने “बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे” म्हणून आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मात्र ही चिठ्ठी नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड यांनी लिहिल्याचे आणि शिवाजी जाधव व तानाजी मधुकर जाधव यांचे संगनमत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या सर्व प्रकरणांतील हस्ताक्षर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवालानंतर अहमदपूर, निलंगा आणि चाकूर पोलिस ठाण्यांमध्ये अनुक्रमे संभाजी धनाजी मुळे, माधव रामराव पिठले, शिवाजी फत्तू जाधव, नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड आणि तानाजी मधुकर जाधव या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३४०(२), २२९(१), २९२(१), २१२(१) आणि २१७(अ) नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
या बनावट चिठ्ठ्यांच्या उघडकीमुळे आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर निर्माण झालेल्या सामाजिक भावना दिशाभूल करण्याचा गंभीर प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Leave a Reply