मुंबई : मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आरे-कफ परेड या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर आजपासून प्रवासी वाहतूक अधिकृतपणे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी या मार्गिकेचे लोकार्पण झाले होते, आणि गुरुवारपासून (९ ऑक्टोबर) सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रोगाडी प्रवासाला निघाली.
एकूण ३३.५ किलोमीटर लांबीचा हा भुयारी मेट्रो मार्ग मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठा टप्पा ठरला आहे. ३९,१२९ कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे आरेहून कफ परेडपर्यंतचा प्रवास केवळ काही मिनिटांत शक्य होणार आहे.
एमएमआरसी (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या माहितीनुसार, गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी गाड्या धावतील, तर सामान्य वेळेत थोड्या जास्त अंतराने गाड्या चालतील. दररोज सुमारे २८ गाड्या २८० फेऱ्या करतील.
या मेट्रो मार्गावर एकूण २७ स्थानके असून, त्यात नरीमन पॉईंट, कफ परेड, चर्चगेट, सीएसएमटी, हाजी अली, वर्ली, दादर, बीकेसी, साकीनाका, आणि आरे अशा महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते आरे या भागातील प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
पहिली गाडी सकाळी ५.५५ वाजता सुटते, तर शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता धावेल. मेट्रोसेवेच्या सुरूवातीने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि पर्यावरणालाही दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, या प्रकल्पामुळे दररोज सुमारे पाच लाख प्रवासी या मार्गिकेचा लाभ घेतील.
Leave a Reply