जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे सोन्या-चांदीच्या किमतींनी नव्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बुधवारी जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे तब्बल ₹१,२७,००० वर पोहोचला, तर चांदी ₹१,६०,००० रुपये किलो दराने स्थिरावली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोन्याचा दर ₹७७,००० रुपये होता. म्हणजेच, अवघ्या ११ महिन्यांत सोन्याने ₹५०,००० रुपयांची वाढ नोंदवली असून गुंतवणूकदारांना तब्बल ६५ टक्के परतावा मिळाला आहे.
सोन्याच्या तेजीसाठी प्रमुख कारणे
1. जगभरातील प्रमुख बँका डॉलरवरील अवलंबित्व कमी करून सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत.
2. ट्रेड वॉर आणि टॅरिफ संघर्षांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चितता वाढली आहे.
3. डॉलरच्या दरातील घसरण आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अस्थिरता.
4. गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम म्हणून पाहत आहेत.
आणखी ५% वाढीची शक्यता
एमसीएक्सवरील तांत्रिक विश्लेषणानुसार सध्या सोन्याच्या भावात ओव्हरबॉट स्थिती दिसत आहे, म्हणजेच काही काळासाठी जोखीम वाढू शकते. मात्र, अमेरिकन शटडाऊन आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे भावात आणखी ५ टक्के वाढीची शक्यता असल्याचे जळगाव बुलियन असोसिएशनचे सचिव सुरेश हेजा यांनी सांगितले.
चांदीही तेजीत
सोन्याबरोबरच चांदीनेही मजबूत तेजी दाखवली आहे. गेल्या वर्षभरात चांदीच्या किमतींमध्ये ₹७७,००० वरून ₹१,६०,००० रुपये किलोपर्यंत झपाट्याने वाढ झाली आहे.
सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दिसणारी ही सातत्यपूर्ण वाढ जागतिक आर्थिक अनिश्चिततेचे द्योतक मानली जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सोने अद्याप आकर्षक पर्याय ठरत आहे.
Leave a Reply