जिन्हें नाज़ है ‘हिन्दू’ पर वो कहां हैं?

साहिर लुधियानवी यांच्या “जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहां हैं” या आर्त गीतातील दुःख आजवर अनेकदा जाणवले होते, पण आज तशाच एका मन उदास करणाऱ्या घटनेने माझे हृदय शतश: विदीर्ण झाले आहे. ती घटना साधीसुधी नाही, ती दुःखद बातमी आहे, निडर, निष्पक्ष पत्रकारितेच्या ढासळत्या दीपस्तंभाची. आजचा दैनिक “द हिन्दू”चा अंक पहिला आणि आधुनिक पत्रकारितेच्या वृत्त प्राधान्याचे बदलते निकष, मन अस्वस्थ करून गेले. महाराष्ट्राने ज्या भव्य विमानतळाची गेली अनेक वर्षे प्रतीक्षा केली होती. मुंबईतील लाखो लोकांनी ज्या मेट्रोचे स्वप्नं पाहिले होते. त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे देशाचे पंतप्रधान उद्घाटन करतात, पण “द हिन्दू” च्या मुंबई आवृत्ती संपादकांना ती बातमी महत्त्वाची वाटत नसेल, तर त्यांच्या पत्रकारितेच्या व्याख्येत नक्कीच बदल झाला असावा… अर्थात दैनिक हिंदूंच्या वेबसाईटवर, त्यांचे स्वत: विषयीचे काय म्हणणे आहे ते पाहिले तर लक्षात येते की, त्यांना आपल्या पत्रकारितेच्या मूल्यांचा प्रचंड अभिमान आहे, ते गर्वाने सांगतात की, “The greatest asset of The Hindu , founded in September 1878, is trust.”
The Hindu, started in 1878 as a weekly, became a daily in 1889 and from then on has been steadily growing.
The Hindu’s independent editorial stand and its reliable and balanced presentation of the news have over the years, won for it the serious attention and regard of the people who matter in India and abroad.
पण आजचा “द हिन्दू” वाचल्यानंतर आपली घोर निराशा होते. कारण जेव्हा, आजपासून दहा वर्षांपूर्वी, नोव्हेंबर २०१५ मध्ये “हिंदूं”ची मुंबई आवृत्ती सुरु झाली होती, तेव्हा एक पत्रकारितेचा विद्यार्थी आणि वाचक म्हणून मला अपार आनंद झाला होता. पत्रकारितेतील एक मानदंड असणारे एन राम सर, हे त्यावेळेस मुख्य संपादक म्हणून काम पाहत होते. ज्या “हिंदू”ने बोफोर्स घोटाळा उघडकीस आणून, देशातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार
कशा प्रकारे चालतो, हे लोकांना दाखवून दिले होते. ज्या “हिंदू”ने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची स्वयंघोषित “मिस्टर क्लीन” ही प्रतिमा आपल्या लेखणीने खरवडून काढली होती. त्या “द हिन्दू”च्या पत्रकारितेत आज जो बदल झाला आहे, तो माझ्यासारख्या पत्रकाराला वेदनादायक आहे.
आज “हिंदूं”च्या पहिल्या पानावर, ज्याला वर्तमानपत्रांच्या परिभाषेत “जॅकेट ऍड” म्हणतात, तशी नवी मुंबई विमानतळ निर्मितीत सहभागी असलेल्या अडाणी उद्योग समूहाची जाहिरात आहे. त्याच्या पाठोपाठच्या पानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या “मिशन शक्ती” उपक्रमाची पानभर जाहिरात आहे. उजव्या हातावर असणाऱ्या तिसऱ्या आणि त्यानंतरच्या चौथ्या पानावर कॅनरा बँकेची पूर्ण पान जाहिरात दिसते. पाचव्या पानावर पेपर सुरु होतो. त्या संपूर्ण पानावर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन झाले, त्याची बोटभर देखील बातमी नाही. दैनिक हिंदूंच्या या मुंबई आवृत्तीत, मुंबईकरांच्या सेवेत पूर्णपणे दाखल झालेल्या अँक्वा मेट्रो लाईनच्या विस्तारित मार्गाच्या उदघाटनाचीही बातमी नाही. ऐंशी टक्के बातम्या दिल्लीच्या दिसतात. हेडलाईन इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या बातमीची आहे, तर त्याच्या शेजारी आहे, पेशावरची बातमी. असो, मला वाटले, म्हणून मी माझ्याकडे येणारे, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, प्रहार, नवशक्ती, लोकमत अगदी शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाने देखील विमानतळ उदघाटनाची बातमी हेडलाईन केली आहे. त्या बातमीला “द हिन्दू”च्या संपादकीय विभागाने अगदी कोपऱ्यात म्हणजे, पान नंबर तेरा वरील “बिझनेस पेज” वर ढकलून दिलेले दिसले. मात्र अँक्वा मेट्रो लाईनच्या विस्तारित मार्गाच्या उदघाटनाची बातमी, या सोळा पानी वृत्तपत्रात कुठेही दिसली नाही. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह कोणाला बहाल केले जाणार यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात काल होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणातील महत्वपूर्ण बातमी सुद्धा या वृत्तपत्रात नाही. महाराष्ट्रातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांची दुरावस्था किंवा मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील दैनंदिन जीवनाशी संबंधित एकही बातमी, जर दैनिक हिंदूंच्या मुंबई आवृत्तीत नसेल, ज्याचा ठळक उल्लेख ते आपल्या मास्टहेड जवळ करत असतात, तर त्यांना तसे म्हणण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो. कारण, मी इंग्लिश वृत्तपत्रात काम केले आहे, त्यामुळे मुंबईच्या भूमीत काम करणाऱ्या जवळपास सर्वच इंग्रजी “न्यूजरूम’मध्ये महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी लोक यांच्याविषयी एक प्रकारची आढ्यता ठळकपणे जाणवते. आपण जर त्यांना काही सांगायला गेलो तर, एखादा बंगाली, मद्रासी किंवा उत्तर भारतीय संपादक आपल्याला शहाणपणा शिकवणार. आणि जर माझ्यासारखा पुराव्यासह बोलणारा, थेट सर्वांसमक्ष काही बोलला तर, आपले महाराष्ट्राबद्दल किती अज्ञान आहे, हे मान्य करून, वरतून भाव खाणार.
आजच्या “द हिन्दू” मधील या अशा कव्हरेज बद्दल, मला एक पत्रकार म्हणून अत्यंत दुःख झाले आहे. तर मराठी भाषिक म्हणून खूप राग आला आहे. त्यासाठी मला कुठल्याही राजकीय पक्षाला हाक करावीशी वाटत नाही. तर मला मराठी भाषिक पत्रकारांना, जे इंग्रजीत काम करतात, त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे अशी विनंती करावीशी वाटते. मराठी घरातील जी नवी पिढी आता इंग्रजी शिकून तयार झाली आहे. त्यांनी या अशा प्रसार माध्यमांना वेळोवेळी जाब विचारला पाहिजे…
शेवटी जाता जाता, एकच सांगावेसे वाटते, ती म्हणजे, ज्या दैनिक हिंदूने महाराष्ट्राला अनुल्लेखाने मारण्याचा प्रमाद केला आहे, त्याच “द हिन्दू” तर्फे येत्या शनिवार – रविवारी सिंगापूरमध्ये मोठा प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला आहे. तस्सेही हे १४७ वर्ष वृत्तपत्र प्रसिद्ध करणारे, कस्तुरी कुटुंब आता “रियल” इस्टेट व्यवसायात उतरले असतील, तर त्यांनी या पत्रकारितेच्या प्रबोधनात्मक क्षेत्रात का वेळ घालवावा?

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *