आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास लावून आयुष्य संपवलं

पालघर : वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुसूचित माध्यमिक आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या एका विद्यार्थ्याच्या बॅगेत एक मोबाईल सापडला असून तो पोलिसांच्या ताब्यात घेतला आहे. शाळा व्यवस्थापक अधीक्षक राजू साकबरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांपैकी एक नववीत तर दुसरा दहावीत शिकत होता. दोघेही मोखाडा तालुक्यातील एका गावातील रहिवासी होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्राथमिक तपासानुसार मानसिक तणाव अथवा कौटुंबिक कारणांचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरवड्यात ही तिसरी आत्महत्येची घटना असल्याने प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजकार्यकर्त्यांनी या घटनांमागील कारणांचा शोध घेऊन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेने आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *