पनवेल – कोकणातील दि. म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ यांना यावर्षीचा “गौरव महाराष्ट्राचा: राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार समारंभ रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय तसेच आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. समारंभ शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे, नवीन पनवेल येथील श्री दादासाहेब धनराजजी विसपुते सभागृहात पार पडणार आहे.
श्री. देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कारकीर्द सोडून पत्रकारिता हे माध्यम क्षेत्र निवडले. त्यांनी पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, गेली ४० वर्षे ते प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय आहेत. सध्या ते न्यूज स्टोरी टुडे (www.newsstorytoday.com) या पोर्टलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार आणि मान-सन्मान प्राप्त केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांना रोटरी इंटरनॅशनल संस्थेचा “व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार” मिळाला आहे. त्यांनी पत्रकारिता आणि समाजविषयक कार्यावर आधारित भावलेली व्यक्तिमत्वे, गगनभरारी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता, प्रेरणेचे प्रवासी, माध्यमभूषण, समाजभूषण, आम्ही अधिकारी झालो अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
त्यांचे नवे पुस्तक ‘संवाद भूषण’ लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर आहे. श्री. भुजबळ यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी जाहीर झालेला ‘माध्यमभूषण’ पुरस्कार संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Leave a Reply