इस्त्रायल–हमास युद्धातील युद्धबंदी करारानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी उघड मागणी केली असून, त्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक एआय जनरेटेड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ट्रम्प यांनी गळ्यात नोबेल शांती पुरस्काराचे पदक घातलेले दिसते, तर त्यांच्या शेजारी नेतान्याहू उभे असल्याचेही दिसते.
नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (माजी ट्विटर) अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करत नॉर्वेजियन समितीला थेट आवाहन केले – “डोनाल्ड ट्रम्प यांनाच नोबेल शांतता पुरस्कार द्यावा, तेच या सन्मानासाठी पात्र आहेत.” असे त्यांनी म्हटले. कॅप्शनच्या शेवटी त्यांनी सुवर्णपदकांचे इमोजीही शेअर केले.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्रम्प यांना प्रत्यक्षात नोबेल पुरस्कार मिळाल्याचे समजले. मात्र नंतर स्पष्ट झाले की हा फोटो खरा नसून पूर्णपणे एआयच्या मदतीने तयार केलेला आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच इस्त्रायल आणि हमास यांच्यातील २० कलमी शांतता प्रस्तावाची घोषणा केली होती. हा प्रस्ताव दोन्ही बाजूंनी मान्य झाल्यानंतर युद्धबंदीचा मार्ग मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक करत त्यांना शांततेचे शिल्पकार म्हणत गौरविले आहे.
सोशल मीडियावर मात्र या घटनेवरून मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी एआय फोटोद्वारे वास्तवाला विकृत स्वरूप देण्याबाबत चिंता व्यक्त केली असून, डिजिटल जबाबदारीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Leave a Reply