राज्यातील हजारो शिक्षक आता आयकर विभागाच्या तपासाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिक्षकांनी त्यांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये (ITR) चुकीच्या कारणांवर आधारित परताव्याचे दावे केल्याचे उघड झाल्याने विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कलम १३१(१ए) अंतर्गत शिक्षकांना समन्स बजावण्यात आले असून, त्यांना वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, अनेक शिक्षकांनी २०२१-२२ आणि मागील वर्षांच्या विवरणपत्रांमध्ये शासनाची फसवणूक करणारे परतावे दाखवले आहेत. काही शिक्षकांनी घरभाडे भत्ता (HRA) सूट मिळवण्यासाठी स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने बनावट भाडेपट्ट्या दाखवल्या आहेत, तर काहींनी गृहकर्ज न घेताही व्याजाच्या सवलतीचा दावा केला आहे. एवढेच नव्हे, तर अनेकांनी एकाच उत्पन्नावर दोन वेळा ‘रिफंड’ घेतल्याचे आणि अस्तित्वात नसलेल्या संस्थांना देणगी दिल्याचे दाखवून कर सवलत मिळविल्याचे समोर आले आहे.
या घोटाळ्यामुळे राज्यभरातील शिक्षकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शिक्षक सध्या चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स कन्सल्टंट्सच्या दारात फिरत असून, त्यांच्या परताव्यांच्या नोंदी तपासण्यात व्यग्र आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई होणार असल्याची माहिती आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
शासनाकडून शिक्षकांनी केलेल्या अशा प्रकारच्या परताव्यांची सखोल चौकशी सुरू असून, ही “आयटीआर हेराफेरी” शिक्षण क्षेत्रासाठी मोठा धक्का मानली जात आहे. अनेक शिक्षकांनी अज्ञानातून चुका केल्याचा दावा केला असला, तरी कर विभाग याकडे गंभीर गुन्हा म्हणून पाहत आहे.
Leave a Reply