‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठरली महागात; व्यापाऱ्याच्या खात्यातून पावणेपाच लाख उडवले

जळगाव : मोबाईलवरील व्हॉट्सअॅपमधील ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग निष्काळजीपणे सुरू ठेवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. एका क्षणात त्याच्या बँक खात्यातील तब्बल ४ लाख ६४ हजार ३४२ रुपये गायब झाले. या घटनेमुळे सायबर सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा इशारा मिळाला आहे.

अजंन कॉलनीतील निलेश हेमराज सराफ यांच्या व्हॉट्सअॅपवर मोबाईल रिपेअरिंग दुकानाच्या नावाने एक संदेश आला. त्यात एका फाइलचा दुवा (link) होता. सराफ यांनी ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग सुरू ठेवलेली असल्याने ती फाइल आपोआप डाउनलोड झाली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस अज्ञात व्यक्तीकडे गेला आणि काही सेकंदांतच त्यांच्या बँक खात्यातून पावणेपाच लाख रुपये वजा झाले.

सराफ यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंगमुळे मोबाईलमध्ये असुरक्षित फाइल्स येऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

सायबर पोलिस निरीक्षक सुनील गोरे यांनी सांगितले की, अनेकजण व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ किंवा संदेश डाउनलोड करण्यासाठी वायफायवर ‘ऑटो डाउनलोड’ सुरू ठेवतात. परंतु, अशा फाइल्समधून मोबाईलचा डेटा हॅक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग बंद ठेवावी आणि कोणत्याही अनोळखी दुव्यावर क्लिक करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

सायबर तज्ज्ञांनीही वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलवरील सेटिंग्ज वेळोवेळी तपासाव्यात, तसेच अँटीव्हायरस आणि सुरक्षा अॅप्सचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *