मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दरवर्षी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करते. यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दीपोत्सवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
दरवर्षी दीपोत्सव दोन ते तीन दिवसांचा असतो. मात्र, यंदा तो १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान दहा दिवस चालणार आहे. भवानी शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाची भव्य मांडणी आणि आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मुंबईतील नागरिकांसह तरुणाईची या उत्सवाकडे नेहमीच विशेष आकर्षण असते. या वर्षी उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाला अधिक राजकीय रंग चढला आहे.
गेल्या वर्षी दीपोत्सव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात आला होता. त्यावेळी मनसेने दीपोत्सवात काही ठिकाणी कॅलेंडरच्या पद्धतीने आपले नाव आणि चिन्ह झळकावले होते. या पार्श्वभूमीवर खा. अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर्षी मात्र राजकीय वातावरण तुलनेने शांत आहे.
या उद्घाटनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा आहे. हिंदू सणांच्या उत्सवांमध्ये एकत्रित भूमिका घेण्यासाठी पक्षांमध्ये संवाद सुरू असल्याचे सांगितले जाते. ठाकरे यांचे भाषण हा या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या उद्घाटनामुळे मनसे आणि उद्धव सेनेतील संबंधांबाबत नवे संकेत मिळू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दीपोत्सव केवळ सांस्कृतिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे.


Leave a Reply