महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सामावून घेण्याबाबत मतभेद उफाळले आहेत. संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद उफाळल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून सपकाळ यांच्या भूमिकेबाबत तक्रार नोंदवली आहे. सपकाळ यांनी मनसे प्रवेशास विरोध दर्शवित स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर राऊत यांनी कोणतीही चर्चा न करता तक्रार पाठवल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात सपकाळ यांचं नाव असूनही ते अनुपस्थित राहिल्यानेही चर्चा रंगल्या होत्या. यावर सपकाळ म्हणाले, “हे शिष्टमंडळ मनसे संदर्भात नव्हतं. निवडणुकांमधील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगाकडे भेट झाली. मला पक्षाच्या कामासाठी दिल्लीला बोलावलं गेल्याने मी उपस्थित राहिलो नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, कोणाला आघाडीत घ्यायचं यावर अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेतील.
सपकाळ यांनी सांगितलं, “रमेश चेन्नीथल यांनी १३ तारखेला पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणतंही वेगळं संकेत मिळालेलं नाही. मी दिल्लीला पक्षाच्या कामासाठी गेलो होतो. राऊत हे इंडिया आघाडीचे नेते आहेत. त्यांच्यासोबत बोलण्यात मला काही अडचण नाही. दिवाळीच्या शुभेच्छा ही मी त्यांना देईन.”
राऊत यांनी मात्र सपकाळ यांच्या भूमिकेवर नाखुशी व्यक्त करत तक्रार पत्राद्वारे हायकमांडपर्यंत नेली आहे. मनसेला आघाडीत घेण्याबाबतचा हा वाद आता आघाडीतील तणावाचं केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मतभेद आघाडीच्या चर्चांवर परिणाम करू शकतो, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.


Leave a Reply