गोकुळ दूध संघच्या डिबेंचर कपातीच्या निर्णयावरून दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांमध्ये संघर्ष उफाळला आहे. डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांनी गुरांसह ‘जवाब दो मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. हा मोर्चा शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, गोकुळने डिबेंचर रकमेतील सुमारे 40 टक्के कपात केली असून यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड न झाल्याची खंत ते व्यक्त करत आहेत. आंदोलनात शौमिका महाडिक यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन गोकुळविरोधात नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. “डिबेंचरपोटी जी रक्कम कापली आहे, ती तातडीने शेतकऱ्यांना परत मिळावी किंवा दूध दरात योग्य वाढ करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गोकुळ प्रशासनाने या वर्षी देखील प्राथमिक दूध संस्थांना डिबेंचर स्वरूपात रक्कम देण्याची घोषणा केली आहे. मात्र, संस्थांचा आरोप आहे की ही घोषणा फसवी असून गतवर्षीपेक्षा 40 टक्के कमी रक्कम देण्यात आली आहे. यावर चार दिवसांपूर्वी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आणि इतर प्रतिनिधींनी योगेश गोडबोले यांना घेराव घालत स्पष्टीकरण मागितले होते.
डिबेंचर कपातीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी गोकुळ कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापटही झाली. आंदोलनकर्त्यांचे निवेदन गोकुळ प्रशासनाकडे देण्यात आले असून, मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


Leave a Reply