सायबर टोळीचा पर्दाफाश; इंटरनॅशनल कनेक्शन उघड

मुंबई : सायबर गुन्हेगारी जगतात मोठा पर्दाफाश करत मुंबई पोलीसच्या रफी अहमद किदवाई मार्ग पोलिसांनी “मार्को” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवकाला अटक केली आहे. या अटकेनंतर तब्बल ५८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मोठा गुन्हा उघड झाला आहे. या रकमेचा मोठा हिस्सा बोगस बँक खात्यांद्वारे चीन व कंबोडियाला ट्रान्सफर केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.

या टोळीने सोशल मीडियावरील फसवे गुंतवणुकीचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर पैसे लाटले. पीडितांकडून मिळालेली रक्कम बोगस खात्यांमध्ये जमा करून ती क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशात पाठवण्यात आली. एकूण २७ “म्युल” खात्यांचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात मार्कोबरोबरच सहा जणांना अटक केली आहे.

तपासादरम्यान आरोपींचा चीन, कंबोडिया, लाओस आणि म्यानमार येथील सायबर टोळ्यांशी थेट संपर्क असल्याचे उघड झाले. आरोपींनी खोट्या नावाने बँक खाती उघडून, गुंतवणुकीच्या आमिषाने पैसे ट्रान्सफर करून घेतले. पोलिसांनी ९० लाखांहून अधिक रक्कम गोठवली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात आरोपींनी KYC प्रक्रियेत घोटाळा करून खोट्या ओळखीने खाती उघडल्याचंही समोर आलं आहे. या कारवाईनंतर देशभरातील सायबर टोळ्यांवर धडाकेबाज मोहिम सुरू होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी गुंतवणूक लिंक, मेसेज आणि ई-मेल्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की सायबर फसवणुकीत गुन्हेगार अधिक चलाख होत आहेत. त्यामुळे बँक आणि वित्तीय संस्थांनी ग्राहकांची काटेकोर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *