हिंगोलीत शिंदे गटाचा स्वबळाचा नारा; आमदार संतोष बांगर यांची घोषणा

हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, जिथे युती शक्य आहे तिथे करा; अन्यथा स्वबळाची तयारी ठेवा. त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत,” असे बांगर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “युती केल्यास अनेकदा कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाही. सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना विजयी करावं.”

हिंगोली नगरपालिका पूर्वी भाजपकडे होती. आता हीच नगरपालिका शिवसेनेने स्वबळावर जिंकण्याचा निर्धार केला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची जागा शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हावरून येईल, असा आत्मविश्वास बांगर यांनी व्यक्त केला. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीनही नगरपालिकांमध्ये हाच पवित्रा ठेवला जाणार आहे.

“जिथे युती होईल तिथे आम्ही युती करू, पण जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत देऊ. कुणावरही टीका करायची नाही, फक्त आपलं काम दाखवायचं आणि पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित करायचं,” असा निर्धारही बांगर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघातही महायुतीत दुरावा निर्माण झाला असून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि भाजप दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर आता हिंगोलीतही शिंदे गटाने तसाच निर्णय घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रंगत वाढली आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *